बुधवार, १७ ऑक्टोबर, २००७

लहानपणीचे खेळ

आम्ही "भोकंजा" नावाचा लपालपीचा खेळ खेळायचो. आमची चाळ लहान होती... चारच बिऱ्हाडे... पण आमच्या चाळीच्या मागे आणि पुढे बरीच मोकळी जागा होती. शिवाय आजूबाजूला इतर चाळी आणि झाडंझुडपंही होती, त्यामुळे लपायला खूप जागा. आजूबाजूची मुले मुली (हो मुली पण, आमच्या चाळीत मुलीच जास्त होत्या) सुद्धा आमच्यात खेळायला यायची.

या भोकंजा खेळात राज्य असणाऱ्याने भिंतीकडे तोंड करून दोन्ही हात डोळावर ठेवून आकडे मोजायचे... १०, २०, ३०... असे १०० पर्यंत. मग एकेकाला हुडकून काढायचं आणि त्याच्या नावानी परत भिंतीवर त्याच ठिकाणी परत जाऊन थाप मारून "अमक्याचा भोकंजा..." असं जोरात ओरडायचं. जर त्याने सगळ्यांना हुडकलं तर जो पहिला सापडला त्याच्यावर राज्य. पण जर का हुडकताना तो भिंतीपासून दूर गेला आणि अजून न सापडलेल्या कोणी भिंतीवर येवून थाप मारली आणि "भोकंजा" असं ओरडलं तर परत राज्य. असा काहीसा खेळ होता.

कधी कधी मी आणि माझे काही मित्र मैत्रिणी मिळून एखाद्या नव्या खेळाडूची किंवा एखाद्या रड्या मुलीची खूप गंमत करायचो. भिंतीकडे तोंड करून आकडे म्हणत असताना आम्ही तीन चार जण त्याच्या (किंवा तिच्या, बऱ्याच वेळेला मुलगीच असायची) अगदी मागेच एका ओळीत उभे रहायचो आणि शंभर म्हणून मागे वळून पाहाताच एकदम तीन-चार जण तिच्या नावाने भोकंजा म्हणून ओरडायचो. तिला आमच्या सर्वांची नावे पुकारून भोकंजा करायला वेळच मिळायचा नाही. कधी-कधी भोकंज्याच्या जागेच्या जवळच आम्ही बरेच जण लपून बसायचो आणि राज्य असणारा खेळाडू जरा भिंतीपासून दूर गेला की सगळे एका ओळीत धावतच भितीकडे जायचो... आणि भोकंजा करायचो. यातही आम्ही लबाडी करायचो कधीकधी... राज्य असणाऱ्याला बऱ्याच वेळा पहिल्या एक-दोघांची नावं पुकारायला वेळ मिळायचा... मग कधी कधी एखाद्या रड्या खेळाडूला आम्ही पुढे ठेवायचो आणि त्याच्या मागून भोकंजा करायला जातोय असं दाखवायचो आणि त्याचा भोकंजा राज्य असणाऱ्याने लावल्यावर मागचे खेळाडू भोकंजा करायचेच नाहीत... मग रांगेत पहिल्या असणाऱ्या त्या बचाऱ्यावर राज्य यायचं.

अशाच प्रकारचा दुसरा खेळ म्हणजे डबा-ऐसपैस. ही नावं कुठुन आली कोण जाणे. यात एक डबा जोरात दूरवर फेकायचा अणि तो राज्य असणाऱ्याने जावून ठरलेल्या ठिकाणी परत आणून उलटा ठेवायचा. मग एकेकाला हुडकून त्याच्या नावाने डब्यावर पाय ठेवून "अमक्याचा डबा-ऐसपैस" असं ओरडायचं. जर तो कोणाला शोधायला डब्यापासून दूर गेलेला असताना लपलेल्या एखाद्या खेळाडूने येवून पायाने डबा उडवला तर परत त्याच्यावर राज्य.

आणखी एक बालीश खेळ म्हणजे देव-आणि-राक्षस. राज्य ज्यावर असेल तो राक्षस. बाकी सगळे देव. राक्षसाने देवांना स्पर्श केला की ते राक्षस होत. या खेळात सीमा ठरलेल्या असायच्या. कोणी सीमेच्या बाहेर गेले तर बाद. बाद झालेला खेळाडूही राक्षस व्हायचा. मग अशा सगळ्या राक्षसांनी हातात हात धरून साखळी करायची आणि उरलेल्या 'देवांना' पकडायचं. सगळे देव संपले की पहिल्या बाद झालेल्या खेळाडूवर पुढचं राज्य. जर राक्षसाची साखळी तुटली तर साखळीतून तुटलेल्या कड्यांतले खेळाडू परत देव व्हायचे. कधी कधी आम्ही काही जण लबाडी करून मुद्दामहून बाद (आणि राक्षस) व्हायचो आणि मग परत साखळी तोडून परत देव व्हायचो त्यामुळे एखाद्या खेळाडूवरचं राज्य संपायचंच नाही... मग चिडाचिडी, भांडणं वगैरे वगैरे.

अशी मजा होती.

शनिवार, १४ एप्रिल, २००७

लिहावं की वाचावं

माझी अनुदिनी केव्हापासून आहे इकडे ब्लॉगस्पॉटवर पण अजून काही फार लिहिलं गेलं नाहीये. लिहिण्यापेक्षा वाचायलाच बरं वाटतं. नाहितरी माझ्याकडे असं काय आहे लिहिण्यासारखं? प्रत्येकानी आहे ब्लॉगरवर खातं म्हणून लिहायलाच पाहिजे असा काही नियम नाहीये. आजकाल मनोगत.कॉम वर बरंच काय काय वाचायला मिळतं (१०० पानात चार चांगली असतात, बाकी गाळ), शिवाय इतर अनेक मराठी साईटस् झाल्या आहेत हल्ली. मराठी विकीपिडीयाचीही आजकाल चांगली प्रगती होत आहे. त्यामुळे मराठीत वाचायला इतकं काही असतं आजकाल इंटरनेटवर.